चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा नगरपरिषदेच्या १० जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. सभेतील घडामोडी आणि शहरातील विकासकामांबाबत जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष सौ. नम्रता पाटील म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा नियोजित वेळेत घेता आली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर सभा आयोजित करण्यात आली. मात्र सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असतानाच काही विरोधी सदस्यांनी गोंधळ घालत कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्या पुढे म्हणाल्या की, सभेतील बहुतांश विषय नगरसेवकांच्या बहुमताने मंजूर करण्यात आले. मात्र दोन ते चाळीस क्रमांकाच्या विषयांना विरोधी सदस्यांनी विरोध नोंदविला. लोकहिताच्या निर्णयांना विरोध करून शहराच्या विकास प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांसंदर्भातील विविध विकासकामे सुरू असून, या कामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला. नागरिकांच्या हितासाठी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम सुरू राहील तसेच विकासकामांचा वेग कमी होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ. नम्रता पाटील यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत, चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
