मेहरुण, जळगांव प्रतिनिधी, महेश माळी : जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लबच्या वतीने ‘नो इलेक्ट्रिसिटी डे’ हा अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमांतर्गत शाळेत शक्य तितका वीजेचा वापर टाळून नैसर्गिक प्रकाशात अध्यापन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जेचा विवेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. प्रत्येक वर्गात ऊर्जा बचत व वीज संवर्धन याविषयी प्रेरणादायी सुविचार, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेश लावण्यात आले. “गरज नसताना दिवे व पंखे बंद ठेवा”, “ऊर्जा वाचवा – पर्यावरण वाचवा”, “आजची ऊर्जा बचत म्हणजे उद्याचे सुरक्षित भविष्य” आणि “प्रत्येक युनिट वीज वाचवणे हीच खरी राष्ट्रसेवा” अशा संदेशांनी विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीवर आधारित फलक तयार करून शाळा परिसरात जनजागृती केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचतीची सामूहिक शपथ घेत दैनंदिन जीवनात वीजेचा अपव्यय टाळण्याचा संकल्प केला.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना, “ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक बचत नसून भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ऊर्जा बचतीची सवय आपल्या घरापासूनच सुरू करावी,” असे प्रतिपादन केले.
विद्यालयात सातत्याने राबविण्यात येणारे ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’, ‘वृक्ष बँक’, बीज बँक, पाणी बचत आणि इतर पर्यावरणपूरक उपक्रमांबरोबरच ‘नो इलेक्ट्रिसिटी डे’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जाणीव अधिक दृढ केली. इको क्लब, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला .
