मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रातील एफ/दक्षिण विभागातील भूखंडावर अनधिकृतपणे हॉटेल सुरू असून, मालमत्ता कर थकीत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित इमारतीचे सुरू असलेले बांधकाम तातडीने स्थगित करण्याचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात येतील. तसेच हॉटेल बंद करण्यासाठीही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

सदस्य अजय चौधरी यांनी मुंबई महानगर पालिकेच्या एफ/दक्षिण विभागामध्ये पवनपुत्र गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प मे.जी.आर.एस.शेल्टर्स या विकासकासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीत सदस्य राम कदम यांनीही सहभाग घेतला.
राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, संबंधित प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याचबरोबर, या अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार आवश्यक असल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील.
