जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण दि. १३ जुलै २०२६ ते दि. २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत (५० दिवस) आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्त तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींचा समावेश आहे.
प्रशिक्षणाचा तपशीलवार अभ्यासक्रम नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार येथील जिल्हा कोषागार कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच पूर्णवेळ उपस्थित राहणे शक्य नसल्यास विशिष्ट मॉड्यूलसाठी प्रवेश घेण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
प्रशिक्षणासाठी आवेदनपत्र व शिफारसपत्र दि. १० जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत. नाशिक विभागातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक बाबुलाल द. पाटील यांनी केले आहे.
