मराठवाडा विभागीय प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे
जालना: बहुजन प्रतिपालक, आरक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव आणि घनसावंगी येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या ठिकाणच्या विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी शाळेला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यामध्ये प्रामुख्याने गावाचे सरपंच दत्तात्रेय वराडे, स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष तथा स्वाभिमानी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष घनसावंगी, ग्रामपंचायत सदस्य श्यामराव शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह चंद्रहास लाड, वैभव उडान आणि सोनू लहामगे आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वडी रामसगाव आणि घनसावंगी येथील कार्यक्रम
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आणि शिक्षकांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले ऐतिहासिक प्रयत्न, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचा घेतलेला निर्णय, तसेच सामाजिक समतेसाठी आणि आरक्षणासाठी दिलेले योगदान याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रसंगी बोलताना सरपंच दत्तात्रेय वराडे आणि उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, “छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि त्यांनी शिक्षणासाठी केलेले कार्य आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घेतले पाहिजे.” विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, या उद्देशाने शाळेत वक्तृत्व आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
“शाहू महाराजांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. आज त्यांच्या जयंतीदिनी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा झालेला गौरव पाहून आनंद होतोय. ” – श्यामराव शिंदे (ग्रामपंचायत सदस्य)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव व घनसावंगी (जालना) येथील कार्यक्रमाचे चोख नियोजन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि अंगणवाडी सेविका यांनी पार पाडले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे व शिक्षकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
