विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिकच्या पथकाने चाळीसगाव येथे सामाजिक वनीकरण विभागातील एका वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेचा पुन्हा प्रत्यय आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वनपाल प्यारेलाल विठ्ठल महाजन (वय ५३) यांनी तक्रारदाराच्या ५० हजार रुपयांच्या कामाच्या बिलाचे देयक मंजूर करण्यासाठी ७,५०० रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम एकूण बिलाच्या सुमारे १५ टक्के असल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदाराने चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे शिवारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम केले होते. या योजनेत त्यांना एकूण ४.५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ५० हजार रुपयांच्या बिलाचे देयक काढण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आरोपीने पंचांसमक्ष ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत. एसीबीने नागरिकांना शासकीय कामांसाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!