जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारु पिवून वारंवार त्रास देणाऱ्या भरत नामदेव पाटील (वय ५८, रा. केसीपार्क) या प्रौढाचा पत्नीने गळा आवळून निघृण खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मयताच्या संशयीत पत्नी मनिषा भरत पाटील (वय ४५) यांची चौकशी करण्यात आली.

शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शहरातील एका कापड दुकानात कामाला होती तर दोघ मुल एमआयडीसीतील कंपनीत कामाला होती. भरत पाटील यांना दारूचे व्यसन असल्यामुळे ते कर्जबाजारी देखील होते. त्यामुळे घरातील संपुर्ण जबाबदारी ही मनिषा पाटील यांच्यावर होती. भरत पाटील हे दारुच्या नशेत दररोज पत्नीसह मुलांना त्रास देत होते. मंगळवारी रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या. त्यावेळी त्यांचे पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेले होते. डोक्यात जबर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने भरत पाटील यांच्या कानातून आणि नाकातून रक्त निघाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी परिसरातील एका तरुणाने भरत पाटील यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
