जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात इ.१० वी मधील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळावे या हेतूने इ.१० वी ला शालेय विषय शिकविणाऱ्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक असलेले बोर्ड परीक्षक व नियामक यांची व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी मार्गदर्शकांनी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, पेपर कसा लिहावा, या बाबत सखोल व उपयोजित मार्गदर्शन केले.

या व्याख्यान मालिकेचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे व प्रमुख व्याख्यात्यांच्या हस्ते सरस्वती देवतेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन व आत्मविश्वास वाढविणे बाबत मार्गदर्शन केले. शाळेचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी व्याख्यानमालेचे उद्दिष्ट स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी व्याख्यानमालेचे शैक्षणिक महत्व स्पष्ट करून विद्यार्थांना उज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या.
व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प शाळेच्या पर्यवेक्षिका रमा तारे यांनी गुंफून इंग्रजी विषयाचा पेपर कसा सोडवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मराठी विषयाचे मार्गदर्शन नियामक वंदना तायडे, हिंदी विषयाचे मार्गदर्शन नियामक अविनाश संदानशिव, संस्कृत विषयाचे मार्गदर्शन नियामक सीमा भारंबे, गणित विषयाचे मार्गदर्शन परीक्षक सुशील झोपे, इतिहास विषयाचे मार्गदर्शन परीक्षक निर्मल चतुर व भूगोल विषयाचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक तथा नियामक सचिन देशपांडे यांनी केले. प्रत्येक विषयातील अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अभ्यासक्रमातील मत्त्वपूर्ण मुद्दे, प्रश्नपत्रिकेची रचना, लेखन कौशल्य, उत्तरलेखनातील मुद्देसूदपणा, संकल्पनांची मांडणी, नकाशा व आकृत्यांचे सादरीकरण, गणितीय सूत्रे, प्रयोगांचे महत्व, व्याकरण, विविध संकल्पना, नियम, पत्रलेखन, निबंधलेखन तंत्र या बाबत सखोल विवेचन केले. या उपक्रमास विद्यार्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, विषयातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्याख्यानमाला प्रमुख प्राजक्ता गोहिल, ज्येष्ठ शिक्षक. ए.व्हि.चौधरी, जे.आर.साळुंखे, इयत्ता १० वी चे विषय शिक्षक रोहिणी प्रचंड, मिलिंद देशपांडे, आनंद पाटील, संगीता पानट, पी.आर.सोनवणे, पी.एम.खंडाळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
