कारंजा प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्याचे तरुण, तडफदार आणि प्रशासनाच्या वर्तुळात चर्चेत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्यावर गंभीर आरोप करत, शासनाच्या दुर्लक्षाच्या विरुद्ध आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदा गवळी मागील सात दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. मात्र दुर्दैव म्हणजे, आजपर्यंत त्याच्या उपोषणाकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही.

विनोद गवळी यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला की, “मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यांवर कुठलाही अंकुश ठेवलेला नाही. उलट, अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे.” स्वतःच्या अनुभवाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, “वाघमारे यांनी मला दिवसभर भेटायला बोलावून उभे ठेवले, मात्र माझ्या समस्या ऐकूनही घेतल्या नाहीत. जर एक सामान्य कार्यकर्ता इतका उपेक्षित वाटतो, तर सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल?”

हे प्रकरण केवळ वैयक्तिक तक्रारीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेत वाढत असलेल्या प्रशासनाविषयीच्या नाराजीचे प्रतीक बनले आहे.

“मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आहे, ना की त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासाठी,” असे ठाम मत नंदागवळी यांनी व्यक्त केले.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली वाशिम येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून, दि. १ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

जनतेच्या प्रश्नांवर डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करत, आवाज उठवणाऱ्या या लढ्याला आता सर्वसामान्यांचा पाठिंबा लाभू लागला आहे. प्रशासनाला हादरवणाऱ्या या उपोषणाकडे शासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

“असे अधिकारी जर जनतेचे ऐकत नसतील, तर ते पद भूषविण्याचा अधिकार त्यांना नाही” — असे भावनिक उद्गार आता रस्त्यावर उतरलेल्या जनतेतून उमटू लागले आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!