मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
विशेष वृत्तान्त, मंञालय मुबंई.
घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि घनसावंगीचे आमदार हिकमत दादा उढाण यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घनसावंगी मतदारसंघातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणे, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

आमदार हिकमत दादा उढाण यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठ्याशी संबंधित स्थानिक समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. यामध्ये काही गावांमध्ये नळजोडणी पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी, पाण्याच्या टाक्यांची अपुरी क्षमता आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची गरज यावर चर्चा झाली. त्यांनी या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
मंञी पाटील यांनी यावेळी सांगितले की, “घनसावंगी मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्व घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण केले जाईल.” त्यांनी अधिकाऱ्यांना १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही दिल्या.
