जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यानुभव व चित्रकला विषयांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, कल्पकता, कृतिशीलता आणि संघभावना निर्माण व्हावी, तसेच विविध कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने “टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे” हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, पुठ्ठा, कापूस, दोरा, डिंक, रंग साहित्य, माती यांसारख्या टाकाऊ वस्तूंपासून दिवाळीचा संदेश देणारी सुंदर शुभेच्छा पत्रे, मातीचे दिवे आणि विविध आकार व प्रकाराचे आकर्षक, पर्यावरणपूरक आकाश कंदील स्वहस्ते तयार केले.
या उपक्रमासाठी चित्रकला व कार्यानुभव विषयाच्या शिक्षिका सौ. नीलिमा सपकाळे आणि सौ. रुपाली महाजन यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकाश कंदील, शुभेच्छा पत्रे आणि मातीचे दिवे शालेय पदाधिकारी व शिक्षकांना भेट म्हणून दिले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे आणि उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना दीपावली सणाचे महत्त्व विशद करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले व सर्वांना दीपावली पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
