जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
अडावद (जळगाव) – अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या तसेच अपहृत मुली, बालके व पुरुषांचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत अडावद पोलिसांनी कसून तपास, गोपनीय माहिती आणि आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे तब्बल २० व्यक्तींचा यशस्वीरीत्या शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग) श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कामगिरी पार पाडली.
दाखल अपहरणाचे गुन्हे (BNS व POCSO अंतर्गत) तसेच हरवल्याच्या (Missing) तक्रारींमधील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासी अंमलदारांनी प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी, साक्षीदारांकडे चौकशी, मोबाईल सीडीआर (CDR) व तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अत्यंत संवेदनशीलतेने राबवलेल्या या मोहिमेत अल्पवयीन मुली, महिला आणि पुरुषांची सुखरूप सुटका करून त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
कामगिरीत सहभागी पथक :
सदर यशस्वी कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली प्रो. पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तायडे, पोलीस हवालदार जयदिप राजपूत, विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण शिरसाठ, अन्वर तडवी, भूषण चव्हाण तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांच्या पथकाने केली आहे.
अडावद पोलिसांच्या या जलद, संवेदनशील व कौतुकास्पद कारवाईमुळे हरवलेले कुटुंबीय सुखरूप परत मिळाल्याने नातेवाइकांकडून पोलिसांचे आभार मानले जात असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
