नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून परिवहन खात्याकडे प्रतिनियुक्तीवर असलेले एसटी महामंडळाचे 500 हून अधिक चालक अखेर एसटीत परतणार आहेत. पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची मोठी माहिती परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. त्यामुळे चालकांच्या तुटवड्याने त्रस्त असलेल्या एसटीला मोठा दिलासा मिळणार आहे.

परिवहन आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले की, एसटीचे चालक गेली पाच वर्षे परिवहन विभागाकडे डेप्युटेशनवर कार्यरत आहेत. दुसरीकडे एसटीच्या ताफ्यात लवकरच टप्प्याटप्प्याने 12 ते 13 हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एसटीकडे चालकांची मोठी कमतरता भासत आहे.

या तुटवड्यावर मात करण्यासाठी शासनाकडे कंत्राटी चालक भरतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. आतापर्यंत एसटीकडून चालक घेतल्यामुळे परिवहन खाते स्वतंत्र भरती करत नव्हते. मात्र आता शासनाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे परिवहन खात्यात मोठे फेरबदल होणार आहेत.

शासनाच्या मंजुरीनंतर परिवहन खात्यातील हंगामी चालकांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाणार असून, यासोबतच नव्याने 150 हून अधिक चालकांची भरती केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेणे आणि इतर तांत्रिक कामे टीसीएस (TCS) कंपनीकडे सोपवण्यात आली आहेत. पुढील तीन महिन्यांत ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन चालक परिवहन खात्यात रुजू होतील, असा अंदाज आहे.

नवीन चालक उपलब्ध होताच परिवहन खात्याकडे असलेले एसटीचे सर्व 500 हून अधिक चालक तात्काळ त्यांच्या मूळ खात्यात म्हणजेच एसटी महामंडळात परत पाठवले जातील, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!