मुंबई – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या कोटा पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी बाईक चालवणारा मुख्य आरोपी हा मुंबईत रॅपिडो बाईक-टॅक्सी चालक म्हणून काम करत असल्याचे उघड झाले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी ऋतिक कुमार उर्फ रोशन हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो मुंबईत रॅपिडोवर बाईक चालवत होता.

तपासात समोर आले आहे की, रॅपिडो चालक असल्याचा फायदा घेत त्याने शहरात मुक्तपणे फिरून टायगर श्रॉफच्या घराची आणि परिसराची रेकी केली होती. प्रवाशांना सोडण्याच्या बहाण्याने त्याने संपूर्ण परिसराची माहिती मिळवली.

रॅपिडो कंपनीने देखील तो त्यांच्याकडे नोंदणीकृत चालक असल्याची पुष्टी केली असून, गेल्या काही दिवसांपासून तो अ‍ॅपवर सक्रिय नव्हता, असे स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेची जोरदार चर्चा

या खुलाशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

मुंबईत रोजगारासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही ठोस नोंदणी आणि कडक पोलीस व्हेरिफिकेशन न होता, ते थेट कॅब, रिक्षा आणि बाईक-टॅक्सी सारख्या सेवांमध्ये कसे सक्रिय होतात? हा गंभीर प्रश्न या घटनेने समोर आणला आहे.

“बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांवर नियंत्रण आणि कडक तपासणी गरजेची आहे,” ही राज ठाकरेंची वर्षानुवर्षांची मागणी या घटनेनंतर मुंबईकरांना अधिक पटू लागल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी जर अशा प्रकारे व्यावसायिक सेवेच्या नावाखाली शहरात सहज वावरत असेल, तर सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे आता खासगी बाईक-टॅक्सी आणि कॅब कंपन्यांच्या चालक भरती प्रक्रियेवर आणि पोलीस पडताळणी यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!