जळगाव, दि. २० ऑक्टोबर – प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल उभारणीत जळगाव जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यातील दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल ८३.४% कामे पूर्ण करून जळगाव जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर बीड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश –
केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
अनेक लाभार्थ्यांचे हप्ते, तांत्रिक अडचणी आणि जागेचे प्रश्न मार्गी लावून प्रशासनाने ही कामे वेळेत पूर्ण केली आहेत. दिवाळीपूर्वी अनेक गरीब कुटुंबांना हक्काच्या घरात प्रवेश मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात कौतुक –
घरकुलच्या कामात जळगावने अव्वल स्थान पटकावल्यामुळे राज्यस्तरावर जिल्ह्याचे कौतुक होत आहे. लवकरच उर्वरित १६.६% उद्दिष्ट देखील पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे.
