झुरखेडा गावावर शोककळा; रेल्वे स्टेशनवरून परतताना काळाचा घाला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव-बांभोरी मार्गावर रविवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गिरणा नदीच्या पुलावर कार आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि कारमधील तिघा तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच गावातील तीन तरुण गेल्याने झुरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

कोण आहेत मृत दुर्दैवी तरुण?

मृत तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावचे रहिवासी आहेत.

१) हरीश हिंमत चौधरी (वय २७)

२) रवींद्र चौधरी (वय ३०)

३) पंकज प्रकाश चौधरी (वय ३०)

हरीश आणि रवींद्र हे दोघे चुलत भाऊ होते.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी हरीश आणि रवींद्र यांच्या काकांचे निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीसाठी आलेले त्यांचे आतेभाऊ सागर धनसिंग पाटील यांना परत गावी जायचे होते. त्यांना सोडण्यासाठी हे तिघेही MH 28 BK 4943 क्रमांकाच्या कारने जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते.

सागर पाटील यांना रेल्वेत बसवून तिघेही कारने झुरखेड्याकडे परतत होते. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बांभोरीजवळ गिरणा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

रुग्णालयात नातेवाईकांचा टाहो

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती देऊन तिन्ही मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आपल्या मुलांच्या, भावांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

एका पाठोपाठ दोन दु:खद घटना घडल्याने चौधरी कुटुंबावर आणि झुरखेडा गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!