विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

मुंबई – महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या लालपरीची ऐन दिवाळीच्या तोंडावर चाके थांबण्याची शक्यता आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.

कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाला संपाची अधिकृत नोटीस दिली आहे. संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी ही माहिती दिली आहे. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यभर बेमुदत संप करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

कर्मचारी संघटनेच्या मते त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त असून त्या तातडीने मान्य कराव्यात:

प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात यावे.

कर्मचाऱ्यांना ६० टक्के महागाई भत्ता (DA) लागू करण्यात यावा.

यंदाच्या दिवाळी सणानिमित्त १५ हजार रुपयांचा बोनस देण्यात यावा.

कर्मचाऱ्यांच्या आणखी कोणत्या मागण्या आहेत?

या मुख्य मागण्यांसोबतच इतरही महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केल्या आहेत:

खासगी चालकांची भरती टाळून २०१९ च्या पात्रता यादीतील उमेदवारांना संधी द्यावी.

चालक, वाहक आणि यांत्रिक पदांची तातडीने भरती करावी.

प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवावा.

नक्षलग्रस्त व आदिवासी भागांतील पूरक भत्त्यांत सुधारणा करावी.

घरबांधणी अग्रिमात वाढ करावी.

केवळ वेतनवाढच नव्हे, तर महामंडळाच्या धोरणांबाबतही कर्मचाऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत:

महामंडळाने खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या विद्युत (E-Bus) बसचे करार रद्द करावेत.

महिलांना राष्ट्रीय सामाजिक गतिशीलता कार्ड (NCMC) ऐवजी रोख तिकीटाचा पर्याय द्यावा.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रवास तिकिटामागील पाच रुपयांची कपात रद्द करावी.

कोरोना काळात प्रत्यक्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये भत्ता द्यावा.

या सर्व मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास ६ नोव्हेंबरपासून एसटीची चाके थांबतील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!