चोपडा तालुका प्रतिनिधी

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि डॉ. कलाम यांच्या विचारांचा जागर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. संदीप बी. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. भूषण आय. बिरारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाबासाहेब के. जाधव यांनी केले. त्यांनी वाचनाचे महत्त्व आणि व्यक्तिमत्व विकासात पुस्तकांचे स्थान यावर प्रकाश टाकला.

प्रमुख वक्ते श्री. भूषण बिरारी यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी इतिहास उलगडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि ज्ञानसाधनेच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत झेप घेणारे डॉ. कलाम यांचे जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. नियमित वाचनाने ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्व समृद्ध होते,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबतच चरित्र, आत्मचरित्र, प्रेरणादायी पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे वाचन करण्याचा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात श्री. संदीप बी. पाटील यांनी वाचन ही दैनंदिन जीवनाची सवय बनवावी, मोबाईलचा योग्य वापर करून ज्ञानवृद्धी साधावी आणि पुस्तकांच्या सहवासातून सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा, असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप बी. देवरे यांनी केले, तर आभार श्री. दिनेश एम. आलम यांनी मानले. यावेळी श्रीमती अनिता पी. लांडगे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

एकूणच हा कार्यक्रम ज्ञानवर्धक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारा ठरला.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!