जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात विज्ञान आणि विवेकाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा उपक्रमशील विज्ञान अभ्यासक श्री. मिथुन धिवरे सर यांचे “चमत्कारामागील विज्ञान – सादरीकरण आणि प्रबोधन शिबिर” उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे मिथुन धिवरे यांचे स्वागत केले.
यावेळी धिवरे सरांनी विद्यार्थ्यांना केवळ विज्ञानाचे महत्त्व सांगितलेच नाही, तर त्यांना प्रत्यक्ष प्रयोगात सहभागी करून घेतले. पाण्याने दिवा पेटवणे, कोऱ्या कागदावर भुताटकी अक्षरे उमटवणे, एक रुपयाचे नाणे अदृश्य करणे, डोळे बंद करून वस्तू ओळखणे, उष्णतेचे वहन, जडत्व यांसारख्या संकल्पना त्यांनी अत्यंत मनोरंजक आणि चमत्कारिक पद्धतीने सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्ट केले.

‘हातचलाखी किंवा चमत्कार नसून हेच खरे विज्ञान आहे’ हे पटवून देत त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले. बौद्धिक खेळांमध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्व-प्रकाशित पुस्तके व पेन देऊन गौरविले.

या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रणित येवले यांनी केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
