प्रतिनिधी, राम ठक्कर.

धुळे – अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही… धुळे आगार परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी कार चालकांवर एसटी आणि आरटीओच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास धुळे आगार परिसरातील नाशिक बायपास क्यूमधून एक खाजगी वाहन चालक परमीट नसताना अवैधरित्या धुळे ते नाशिक प्रवाशांना घेऊन जात असल्याची माहिती विभागीय वाहतूक विभागाला मिळाली.

माहिती मिळताच डॅशिंग विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे दिलीप बंजारा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून सदर वाहनावर कारवाई केली.

यावेळी स्विफ्ट डिझायर क्र. MH 18 BZ 2978 ही कार जप्त करण्यात आली. चालक हा सीट लावून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरटीओ विभागामार्फत संबंधित खाजगी वाहन चालकास रु. १९,५००/- चा दंड ठोठावण्यात आला.

या कारवाईवेळी विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधीक्षक सुनील महाले यांच्यासह आरटीओ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, सणासुदीच्या काळात अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला असून, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेकायदेशीर वाहनांवर अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!