विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

यावल – आगामी सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहिमेला यावलमध्ये मोठे यश मिळाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि यावल पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सापळा रचून एका तरुणाला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक केली आहे.

पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या सूचनेनुसार यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व गस्त वाढविण्यात आली होती.

दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांचे पथक यावल परिसरात गुन्हे प्रकटीकरणाचे काम करीत असताना, पवन सोनवणे हा इसम स्वतःजवळ बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने यावल ते चोपडा महामार्गावर किनगाव फाट्याजवळील ‘हॉटेल श्री’ समोर सापळा रचला. सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास संशयित पवन सोनवणे याला ताब्यात घेण्यात आले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेली लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल (कट्टा) आणि पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर शस्त्रे जप्त केली आहेत.

पोलीस अंमलदार सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पवन सोनवणे याच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स अॅक्ट) कलम ३, २५(१-B)(a) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली एलसीबीचे पोउनि सोपान गोरे, पोलीस अंमलदार सलीम तडवी (पोकॉ २५३४), मयुर निकम (पोकॉ ५९८), सचिन घुगे (पोकॉ ८७८) तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोउनि मैनुद्दीन सय्यद आणि हितेश बागुल (पोकॉ २२६) यांच्या पथकाने केली.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!