जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
अंबड तालुक्यातील बहुचर्चित गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यासाठी अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपलब्ध पाण्यातून गल्हाटी प्रकल्पाला प्राधान्याने पाणी सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) शहापूर येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. सन १९८८ पासून शेतकरी या प्रश्नासाठी शासन आणि प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. गुंज, साष्ट-पिंपळगाव आणि गल्हाटी या तिन्ही भागांची एकत्रित पाण्याची मागणी मोठी असताना, उपलब्ध पाण्याच्या नियोजनात लाभक्षेत्राला प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, महिलांचा आक्रोश
यावेळी महिलांनीही प्रशासनाला धारेवर धरले. केवळ शेतीचाच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पाण्याअभावी गावातून स्थलांतर करण्याची वेळ आली असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली.
मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ
गल्हाटी परिसरातील जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या शेकडो मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेवरही या पाणीटंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. धरणात पाणी नसल्याने मासेमारी ठप्प झाली असून अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध पाण्यातून प्रकल्पास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शासनाने या प्रश्नाकडे केवळ आश्वासन न देता ठोस आणि कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे उपोषण शांततामय मार्गाने पार पडले असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गल्हाटीच्या पाणीप्रश्नावर आता शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
