मराठवाड्यात ३००० तर पश्चिम महाराष्ट्रात ३६०० रुपये दर का? — राजू शेट्टींचा सवाल चर्चेत
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
घनसावंगी तालुक्यातील साखर कारखाने आगामी गळीत हंगामासाठी सज्ज होत असतानाच, कारखाने सुरू होण्यापूर्वीच ऊसदरासाठी आवाज उठवण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. “दर ठरल्यानंतर ओरड करण्यापेक्षा कारखाने सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद करावा,” असे थेट आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध साबळे यांनी केले आहे.
राजू शेट्टींच्या वक्तव्याने पेटली ठिणगी
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या संदर्भात उपस्थित केलेला प्रश्न सध्या शेतकरी वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. “मराठवाड्यातील कारखाने तीन हजार रुपये दर जाहीर करत आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने तीन हजार सहाशे रुपये दर जाहीर करत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो, हे तुम्हाला मान्य आहे का? मराठवाड्यात उत्पादन खर्च जास्त असताना दर कमी का?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रति टन ३५०० ते ३८०० रुपये दराची मागणी
घनसावंगी परिसरातील ऊस बागायतदार शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून किमान ३,५०० ते ३,८०० रुपये प्रति टन भाव मिळवण्यासाठी आतापासूनच आंदोलनाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दर ठरतानाच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि आपली ठोस मागणी मांडावी, जेणेकरून नंतर रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही, अशी भूमिका अनिरुद्ध साबळे यांनी मांडली आहे.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या बैठकांचे सत्र सुरू असून, पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी येत्या आठवड्यात घनसावंगी येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
