विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
20 वर्षीय तरुणीवर अत्याचार; मुंबईला पळण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना 3 तासांत अटक
छत्रपती संभाजीनगर: शहराला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. उपचारासाठी घाटी रुग्णालयात आलेल्या 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
घाटी रुग्णालयासमोरील जुन्या क्वार्टर्सच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना 19 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. आरोपींनी पीडितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
या भयानक प्रकारानंतर पीडितेने हिंमत दाखवत तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
मुंबईला पळण्याचा कट; पोलिसांनी उधळला
गुन्हा दाखल होताच बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन्ही आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या टीम तयार करून जाळे विणले आणि अवघ्या 3 तासांत दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींची नावं रोहन जगदीश रिडलान आणि विशाल प्रकाश चावरिया अशी आहेत. रोहनला पोलिसांनी जालना परिसरातून ताब्यात घेतलं, तर विशालला संभाजीनगर शहरातील जुबली पार्क परिसरातून बेड्या ठोकल्या. तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता.
दोन्ही आरोपींवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत.
