सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार; ‘एक झाड, एक संकल्प’चा हरित संदेश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
चोपडा गणेशोत्सव ते अनंत चतुर्दशी अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, चोपडा तालुका यांच्या वतीने तरुण मंडळ वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या अभियानांतर्गत चोपड्यातील स्थानिक गणेश मंडपात मोफत रोपे वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात वन विभागाचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, नागरिक, महिला, तरुण आणि बालकांनी सहभाग घेतला. ‘झाडे मोफत दिली जातील’ आणि ‘एक झाड, एक संकल्प’ या संकल्पनेतून उपस्थितांना रोपांचे वितरण करण्यात आले.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच चोपडा तालुका अधिक हरित, सुंदर आणि समृद्ध बनविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तरुण मंडळांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देत गावागावांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना केवळ रोपे घेऊन न थांबता त्यांचे योग्य ठिकाणी वृक्षारोपण करून नियमित संगोपन करण्याचे आवाहन केले. ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले. आगामी काळातही वृक्षारोपण, रोपवाटप आणि पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.
*‘सुंदर चोपडा, समृद्ध चोपडा’* या ध्येयाने राबविण्यात आलेला हा उपक्रम हरित आणि पर्यावरणपूरक भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
