जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
शिस्तबद्ध मिरवणुकीत घेतला 700 विद्यार्थांनी सहभाग

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता श्री. गणरायाची मंगलमय वातावरणात मोठ्या भक्तिभावाने शाळेतील कला शिक्षक श्री प्रेम सारस्वत यांनी स्वहस्ते बनविलेल्या शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. श्री. सुशीलदादा अत्रे यांच्या शुभ हस्ते विधिवत करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री अभिजीत देशपांडे, संचालक ॲड.श्री.पंकजदादा अत्रे, श्री.सचिन दुनाखे, शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, सौ.लीना कुलकर्णी, सौ. अर्पणा मुळे, उपमुख्याध्यापक श्री.संजय वानखेडे, श्री.अनिल सैंदाने, पर्यवेक्षिका सौ रमा तारे, श्री.सुभाष पाटील, श्री.जगदीश साळुंखे, तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे यांच्या “अत्रेय आश्रम ” या निवासस्थाना पासून श्री.गणरायांच्या सवाद्य मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. या वेळेस सजविलेल्या ट्रॅक्टर वर बुद्धी व बलाची देवता श्री गणरायांची उत्सव मूर्ती विराजमान करण्यात आली होती. त्यापुढे ढोल ताशा पथक सौ.प.न.लुंकड कन्या शाळेचे झांज पथक, वाद्य पथक, शेठ ला.ना. सा.विद्यालयाचे मुलींचे झेंडा पथक, वाजंत्री त्यापुढे मुलींचे लेझीम पथक, एन.सी.सी.पथक, शालेय विद्यार्थी पथक, अशी शिस्तबद्ध रचना करण्यात आली होती. या वेळेस ढोल ताशांच्या निनादात विविध पथकाने तालबद्ध समूह नृत्य सादर केले. त्यांना मार्गदर्शन श्री.उल्हास ठाकरे, श्री.पंकज महाले, श्री.उमेश ढाकणे, सौ.अनिता माळी यांनी करून पथकांचे शिस्तबद्ध प्रदर्शन सादर करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

या वेळेस “गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया” असा जयघोष करण्यात आला. काही विद्यार्थी तसेच शिक्षक श्री.योगेश सोनजे यांनी दोन्ही हातात वर्तुळाकार दिशेत काठी फिरवून प्रात्यक्षिक सादर केले. तसेच काही शिक्षकांनी देखील नृत्याचा आनंद घेतला. श्री.गणपती गीतावर विद्यार्थिनींनी सुंदर समूह नृत्य सादर केले. मिरवणूक शिवाजी चौक मार्गे शेठ ला.ना.विद्यालयात येऊन समारोप करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे व शालेय पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते, त्यामुळे विद्यार्थांच्या उत्साहात भर पडली होती शाळेत आकर्षकरीत्या सजविलेल्या श्री.गणेश मंडपात पर्यावरण पूरक श्री.गणरायांची विधिवत स्थापना व श्री.गणरायांची महाआरती संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

श्री गणेशोत्सवानिमित विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या हेतूने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१) रंगीबेरंगी पताका बनविणे,
२) कागदी हार बनविणे,
३) कागदी पुष्प गुच्छ बनविणे,
४) मोदक सजावट करणे,
५) एका मिनिटात जास्तीत जास्त श्री.गणपतीची नावे सांगणे,
६) माझा पर्यावरण पूरक गणेशोत्सव निबंध स्पर्धा,
७) पेंट प्रोग्रामचा उपयोग करून श्री.गणरायांची विलोभनीय प्रतिमा साकारणे,
८) श्री.गणेशोत्सव यावर स्लाईड शो,
९) सामूहिक अथर्वशीर्ष पठण
१०) “माझा बाप्पा, माझी आरास”

आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांनी केले आहे.वरील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीं विशेष परिश्रम घेत आहेत.
