जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.

‘आम्ही जुळलो, आपणही जुळा’चा नारा; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांविरोधात नाराज संचालकांची मोट

जळगाव : ग.स. सोसायटीच्या आगामी निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून, विद्यमान संचालक मंडळाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आजी-माजी नाराज संचालकांनी एकत्र येत ‘गुरु मित्र’ या नव्या गटाची स्थापना केली आहे. ‘आम्ही जुळलो, आपणही जुळा’ असा नारा देत या गटाने आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आजी-माजी संचालक एकत्र आले आहेत. संस्थेच्या कारभारात सहकार कायद्याचे उल्लंघन तसेच आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप या गटाकडून करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांसमोर ‘गुरु मित्र’ गटाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या बैठकीला ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुभाष देशमुख जाधव, तुकाराम बोरोले, विलास नेरकर यांच्यासह विविध आजी-माजी संचालक, ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सुनील पाटील, संजय पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दिलीप वांगर, वाल्मीक पाटील, गजानन देशमुख, पी.एस. सोनवणे, सदाशिव सोनवणे, गिरीश वाणी, गुणरत्न पाटील, गजानन नारखेडे, विक्रम सोनवणे, प्रमोद कोळी, रमेश पवार आदींचा समावेश होता.

आगामी निवडणुकीपूर्वी नाराज संचालकांची ही एकजूट कितपत प्रभावी ठरते आणि ‘गुरु मित्र’ गटाला सभासदांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता ग.स. सोसायटीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!