जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार, विशेष वृत्तांत.

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांवर हल्ल्याची आणखी एक गंभीर घटना समोर आली असून, पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या दोन बीट मार्शलवर मद्यपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. शिवाजीनगरमधील सेंट्रल मॉल चौकाजवळ पहाटे (रविवार 13 सप्टेंबर) अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात आणि शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ जणांचा एक मद्यपी गट परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांच्या बीट मार्शलना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बीट मार्शल सूरज पवार आणि ऋत्विक वाघ हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मद्यपींना हटकून गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपी ओम मराणे आणि सुनील बोरकर यांनी पोलिसांवर अचानक चाकूने हल्ला चढवला.

या झटापटीदरम्यान झालेल्या हल्ल्यात बीट मार्शल सूरज पवार यांचे जॅकेट फाटले असून, त्यांच्या पोटाला दुखापत झाली आहे. कर्तव्यावर असतानाच थेट पोलिसांवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!