जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार
पाचोरा : कामगार आणि श्रमिकांचे आराध्यदैवत मानले जाणारे भगवान विश्वकर्मा यांची १७ सप्टेंबर रोजी होणारी जयंती ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून अधिकृतपणे घोषित करून साजरी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भारतीय मजदूर संघ (जळगाव जिल्हा) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नावे निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. विनोद कुमावत यांना देण्यात आले.
देशाच्या उभारणीपासून विविध क्षेत्रांच्या विकासापर्यंत कामगार आणि श्रमिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान विश्वकर्मा हे कारागीर, बांधकाम कामगार, तंत्रज्ञ तसेच विविध श्रमिक वर्गाचे आराध्यदैवत मानले जातात. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या श्रमिकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी श्रमिकांच्या योगदानाची दखल घेऊन १७ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावर श्रमिक सन्मान दिन म्हणून मान्यता मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पी. जी. आप्कापा पाटील, भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार संघाचे सहसचिव संतोष दांडेकर, तसेच भगवान वाघ, विकास सुतार, प्रशांत सुतार, अरुण मिस्त्री, रवि मिस्त्री यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा तहसील कार्यालय परिसरात निवेदन देताना श्रमिकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी संघटनेच्या वतीने ही मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात आली.
