विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

मुक्ताईनगर तालुक्यातील दुई गावात भरधाव आयशर वाहनाने दोन महिलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुई गावातील दूध डेअरीजवळ सुकडीकडून पूर्णाकडे जाणाऱ्या भरधाव आयशरच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या दोन महिलांना जोरदार धडक दिली.

या धडकेत छायाबाई मोतीराम पाटील (वय ४२) आणि शोभाबाई कडू पाटील (वय ४८) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर मदत करण्याऐवजी चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला.

गावकऱ्यांची धाव, मात्र उपचारादरम्यान मृत्यू

अपघाताची वार्ता समजताच दुईचे माजी सरपंच संदीप जावळे, रामलाल भिल, अनिल पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तात्काळ एका खाजगी वाहनातून दोन्ही जखमी महिलांना मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचार सुरू असतानाच छायाबाई पाटील यांची प्राणज्योत मालवली. तर शोभाबाई पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले होते. दुर्दैवाने जळगाव येथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर, पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू

मृत पावलेल्या दोन्ही महिलांचे पती शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. छायाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे, तर शोभाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलीस पसार झालेल्या आयशर चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!