विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जळगाव : धरणगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित बायपास मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यासाठी दीड ते दोन कोटींचा निधी प्रस्ताव १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

सोमवारी पालकमंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नगरपालिका आणि शेतपांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यासह मंजूर असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आगामी काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, “ज्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे ती तातडीने सुरू करा. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती पूर्णत्वाकडे न्या. अद्याप सुरू न झालेली कामे तात्काळ मार्गी लावा. येत्या १५ दिवसांपासून ते महिनाभरात प्रत्येक कामात ठोस प्रगती दिसली पाहिजे. नागरिकांना कामांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात दिरंगाई होता कामा नये.”

बायपासचा प्रस्तावित मार्ग असा –

धरणगाव बायपाससाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या मागून जांभोरे रेल्वे गेट, गणेश नगर मागून मधुकर नगर ते ख्वाज्याजी नाईक स्मारका मागून, प.रा. संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अशा पद्धतीने सुमारे १५ किमी लांबीचा बायपास मार्ग प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्री पाटील यांनी सांगितल्यानुसार जांभोरे – रेल्वे गेट – गणेश नगर – पी.आर. कॉलेज असा हा प्रस्तावित मार्ग असेल.

‘निकृष्ट काम खपवून घेणार नाही’

“विकासकामांसाठी निधी जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच मंजूर निधीतून काम वेळेत आणि दर्जेदार होणे महत्त्वाचे आहे. शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन कामांची वेळोवेळी पाहणी करावी. सुरू न झालेली कामे तात्काळ सुरू करा आणि प्रगतीतील कामे पूर्ण करा,” असा सज्जड दमच पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

शासन स्तरावर मंजुरीसाठी आवश्यक असलेले प्रस्ताव, अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता व DPR विहित मुदतीत सादर करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे आणि बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!