जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

चोपडा : तालुक्याचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज तालुक्यातील आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान त्यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची आस्थेने विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

मागील आठवड्यात बढाई येथे नाना बारेला यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. आमदार सोनवणे यांच्या मदतीने त्यांना प्रथम सिव्हिल हॉस्पिटल तसेच पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आमदारांनी बढाई येथे नाना बारेला तसेच राकेश पावरा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पुढील आवश्यक मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दरम्यान, शेवरेपाडा येथे तीन वर्षीय बालकावर कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. आमदार सोनवणे यांनी त्या बालकाचीही भेट घेऊन प्रकृतीची पाहणी केली. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गस्त वाढवणे, आवश्यकतेनुसार पिंजरे लावणे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी आदिवासी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले, “तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. घाबरून जाऊ नका. तुम्हाला भीती वाटत असेल तर मी पुन्हा आठ दिवसांनी तुमची भेट घेण्यासाठी येईन. मी तुमच्यातलाच आमदार आहे. तुमचं दुःख ते माझं दुःख आणि तुमचं संकट ते माझं संकट आहे. तुमच्यासाठी केव्हाही मदत करण्यास मी तयार आहे.”

या भागातील तिन्ही गावांकडे जाणारे रस्ते अत्यंत खडतर असल्याने अनेक ठिकाणी वाहन पोहोचणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत आमदार सोनवणे यांनी काही अंतर पायी चालत, तर काही ठिकाणी वन विभागाच्या वाहनातून प्रवास करत आदिवासी बांधवांची भेट घेतली.

अवघड व दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांनंतर जखमींची विचारपूस करणे आणि प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना देणे, यामुळे त्यांच्या या भेटीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आदिवासी बांधवांच्या सुख-दुःखात प्रत्यक्ष सहभागी होत, दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा हा प्रयत्न सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!