विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

टाकळी-पिंपळखेडा शिवारात लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोन शेतकरी गंभीर जखमी

जामनेर : शेतामध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारूविक्रीला विरोध करणे दोन शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडले. दारूविक्रीला विरोध केल्याच्या रागातून सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दोन शेतकऱ्यांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील टाकळी-पिंपळखेडा शिवारात घडली. या हल्ल्यात प्रवीण राजपूत आणि सुनील माळी हे दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

टाकळी-पिंपळखेडा परिसरातील शेतांमध्ये काही समाजकंटकांकडून गावठी दारूची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीही या प्रकाराला विरोध केला होता. आपल्या शेतात दारूविक्री करू नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही संबंधितांकडून हा प्रकार सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमवारी पुन्हा शेतात दारूविक्री सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण राजपूत आणि सुनील माळी यांनी त्यास विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या दारूविक्रेत्यांनी साथीदारांना सोबत घेत शेतकऱ्यांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, अवैध दारूविक्रीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरच हल्ला होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!