महिला भाविकांच्या दांडिया उत्सवाने रंगली भक्तीची मैफल; गोपाळकाल्याच्या महाप्रसादाचा ग्रामस्थांनी घेतला लाभ
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.
चांदा : जय श्री राधे, मा. नर्मदा आश्रम, चांदा येथे श्री गोकुळाष्टमी निमित्त भव्य नंदोत्सव व गोपाळकाला सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हरिभक्त परायण भागवताचार्य शिवानंद महाराज दहातोंडे यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवानंद महाराज दहातोंडे यांच्या अमृतवाणीतून भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, नंदोत्सवाचे महत्त्व आणि दहीहंडीची परंपरा यांचे रसाळ वर्णन करण्यात आले. त्यांच्या ओघवत्या प्रवचनाने उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते चांदा परिसरातील महिला भाविकांनी सादर केलेला दांडिया उत्सव. श्री राधा राणी महिला सत्संग मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी मोठ्या उत्साहाने दांडियामध्ये सहभाग घेतला. मंडळाचे नेतृत्व करणाऱ्या सौ. मरकड मॅडम, सौ. जयश्री दहातोंडे आणि सौ. भाग्यश्री दहातोंडे यांनी महिलांना दांडियासाठी मार्गदर्शन केले.
भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या आगळ्यावेगळ्या नंदोत्सवामुळे आश्रम परिसरात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. महिला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल शिवानंद महाराज दहातोंडे यांनी सर्व महिला भाविकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर गोपाळकाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित भाविक, ग्रामस्थ आणि भक्तांनी घेतला.
एकूणच, श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन, प्रवचन, दांडिया आणि गोपाळकाला महाप्रसाद अशा विविध उपक्रमांनी मा. नर्मदा आश्रमातील नंदोत्सव सोहळा भक्ती आणि उत्साहाने अविस्मरणीय ठरला.
