स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी सुरूच; रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे फेज जाण्याच्या तक्रारी वाढल्या
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी :
जळगाव शहरातील ताहानगर परिसरात वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने विशेष वीज चोरी शोध मोहीम राबविली. या मोहिमेत स्मार्ट मीटरनंतरही अनधिकृत पद्धतीने वीज वापर करणारे १४ ग्राहक आढळून आले असून, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे वाढल्या समस्या
ताहानगर परिसरातील रोहित्रावर गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त भार वाढल्याने वारंवार फेज जाणे, कमी दाबाचा वीजपुरवठा तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी महावितरणकडे प्राप्त होत होत्या. या समस्यांच्या कारणांचा शोध घेत असताना वितरण यंत्रणेवर अनावश्यक भार पडत असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर संबंधित परिसरातील वीज जोडण्यांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी अभियंता गणेश महाजन आणि उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या पथकाने ताहानगर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविली.
तपासणीत अनधिकृत वीज वापर उघड
मोहिमेदरम्यान घरगुती तसेच इतर वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. मीटर, सर्व्हिस वायर आणि जोडणीची पाहणी करताना काही ठिकाणी अनधिकृत पद्धतीने वीज वापर होत असल्याचे आढळून आले. तपासणीत वीज चोरीचे प्रकार आढळलेल्या एकूण १४ ग्राहकांविरुद्ध महावितरणने नियमानुसार कारवाई सुरू केली आहे.
वीज चोरीचा फटका प्रामाणिक ग्राहकांनाही
वीज चोरीमुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे रोहित्रावर ताण येऊन फेज जाणे, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि वारंवार वीज खंडित होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. याचा थेट फटका नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांनाही बसतो.
वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून संवेदनशील भागांमध्ये तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येत असून, वीज चोरी करताना आढळणाऱ्यांविरुद्ध वीज कायद्यानुसार कठोर कारवाई केली जात आहे.
