आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी बंद; शहरी वसतिगृहांमध्ये पुन्हा सुरू होणार मेस व्यवस्थ
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित
नाशिक – आदिवासी विकास विभागाने शहरी भागातील आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धत रद्द करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना वसतिगृहातच मेसच्या माध्यमातून भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सन २०१८ पासून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात भोजनासाठीची रक्कम थेट जमा केली जात होती. मात्र, ही रक्कम वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत होत्या. या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने मेस व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित शहरी आदिवासी वसतिगृहांमध्ये मेस सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून मेस व्यवस्था सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, डीबीटी योजनेची प्रभावी आणि योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा भोजन ठेकेदारी पद्धतीकडे वळावे लागत असल्याची टीकाही केली जात आहे. ग्रामीण भागातील काही वसतिगृहांमध्ये सेंट्रल किचनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत यापूर्वी तक्रारी झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आता शहरी आदिवासी वसतिगृहांमध्ये मेस व्यवस्था सुरू होणार असली तरी, भोजनाचा दर्जा, नियमित पुरवठा आणि व्यवस्थेतील पारदर्शकता याबाबत भविष्यात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व वेळेवर भोजन मिळावे, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची चर्चा आहे.
