जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरुण : जिल्हा परिषद जळगाव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. २९ ऑगस्ट २०२६, शनिवार रोजी स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून बाल स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच परिसरातील स्वच्छतेची कामे केली. ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले.
लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य, श्रमप्रतिष्ठा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, तसेच स्वच्छतेची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कचरा कचरापेटीत टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छतेची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारणे याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी सहकार्य केले. जिल्हा परिषदेकडूनही शाळा, विद्यार्थी, पालक व समाजाच्या सहभागातून स्वच्छ आणि सुंदर शाळा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
