जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहरातील काही भागांत गवळ किंवा भुरकट रंगाचे पाणी येत असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर चोपडा नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आश्वासन दिले आहे. पाण्याची गुणवत्ता व नागरिकांच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे कच्च्या पाण्यात गवळपणा व मातीचे प्रमाण वाढले होते. सदर पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक त्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे प्रक्रिया करूनच शहरास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तरीही शुद्धीकरणानंतरही पाण्याचा रंग काही प्रमाणात भुरकट दिसून येत होता.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. नगरपरिषदेमार्फत लाऊडस्पीकरद्वारे शहरात घोषणा करून नागरिकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, धरणातील पाणी आता स्थिर (Settle) झाल्याने कच्च्या पाण्यातील गवळपणा कमी झाला असून पाण्याचा रंग नेहमीप्रमाणे झाला आहे. पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर नगरपरिषद प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून वेळोवेळी ओ.टी. (O.T.) चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने नियमितपणे दर आठवड्याला जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानुसार पाण्याची गुणवत्ता योग्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
नागरिकांनी पाण्याच्या रंगामध्ये तात्पुरता बदल झाल्याने घाबरून जाऊ नये, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
*नगराध्यक्षा नम्रता ताई सचिन पाटील यांचे स्पष्ट आवाहन*
चोपडा नगरपरिषदेच्या मा. नगरअध्यक्ष नम्रता ताई सचिन पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा. नगरपरिषदेमार्फत नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी नगरपरिषदेशी संपर्क साधावा. पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रार अथवा अडचण असल्यास ती तात्काळ नगरपरिषदेकडे नोंदवावी. शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असून यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे नगरअध्यक्ष नम्रता ताई सचिन पाटील यांनी सांगितले.
