मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : नाशिक जिल्हा परिषदेतील गट शिक्षण अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक झाल्याप्रकरणी शिक्षण आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न उपस्थित केला. यास उत्तर देताना ते बोलत होते. तर सदस्य सत्यजित तांबे यांनी उपप्रश्न उपस्थित केला
राज्यमंत्री भोयर म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेतील गट शिक्षण अधिकारी आणि इतर दोघांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. अटकेनंतर संबंधित अधिकाऱ्याला नियमानुसार निलंबित करण्यात आले आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्याविरोधात यापूर्वीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र माहिती शिक्षण आयुक्तांकडून मागविण्यात येणार आहे, संबंधित अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत कसे रुजू करण्यात आले, केवळ निलंबनाचीच कारवाई का करण्यात आली आणि त्याला बडतर्फ करता येईल का, याबाबत सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल.
