मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढविणे आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे व अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणे तसेच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून, देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचे पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून, भविष्यात तालुका व जिल्हास्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आले आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून, शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्याने उपाययोजना करत असल्याचेही पणन मंत्री रावल यांनी नमूद केले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!