मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे आणि वझुर येथील गोदावरी नदीवरील पुलांच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते. यावेळी सदस्य हरीश पिंपळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, धानोरा काळे (ता. पूर्णा) येथील राज्य मार्ग-३५ वरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूंच्या पोचमार्गासाठी आवश्यक भूसंपादनही पूर्ण झाले असून, जनतेच्या मागणीनुसार भुयारी मार्ग, घाट बांधणी तसेच जीएसटीतील वाढ यांचा समावेश करून ३२.४४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच उर्वरित काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
तसेच वझुर (ता. पूर्णा) येथील प्रमुख जिल्हा मार्ग-३५ वरील गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाला, कोविड-१९ महामारी, लॉकडाऊन तसेच नदीपात्रातील पाण्याच्या साठ्यामुळे कामाला विलंब झाला. त्यानंतर तांत्रिक बदल करून प्री-कास्ट गर्डर पद्धतीला मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत ४५ पैकी ३५ गर्डर तसेच ८ पैकी ४ पिअर कॅपपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधी उपलब्ध करून देऊन हे कामही नियोजनबद्ध पद्धतीने लवकर पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले .
