मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसेच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117 टक्के उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्याचेही विभागाने कळविले आहे. मात्र, सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील, असे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!