मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : संगमनेर नगर पालिकेमार्फत केंद्र पुरस्कृत सुधारित पाणीपुरवठा योजनेतील निविदा प्रक्रियेत नियमांचे पूर्ण पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, या प्रकरणाची चौकशी करून निष्कर्षानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

विधानसभा सदस्य अमोल खताळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री मिसाळ बोलत होत्या.
राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, केंद्र पुरस्कृत लहान व मध्यम शहरांसाठी पायाभूत सुविधांच्या विकास योजनेंतर्गत संगमनेर नगरपालिकेमार्फत ८.७८ कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. याच्या निविदा प्रक्रियेपूर्वी अंदाजपत्रकात निदर्शनास आलेल्या त्रुटीनुसार नगरपरिषदेमार्फत बदल करून ९.२९ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आली होती, असे नगरपरिषदेने कळवले आहे.
मात्र, मोठ्या प्रकल्पांच्या निविदा निश्चित करताना शासनाच्या प्रचलित नियम व निकषांचे पालन होणे आवश्यक असताना या प्रकरणात त्याचे पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत सखोल चौकशी करून त्यातील निष्कर्षानुसार उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
