चोपडा शहर प्रतिनिधी. अतुल माळी.

चोपडा शहरातील मेणबत्ती चौक परिसरातील न्यू बापू टी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी हॉटेल मालक राहुल भगवान महाजन (वय ३८, रा. अशोक नगर, चोपडा) याच्याविरुद्ध बालकामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, न्यू बापू टी हाऊसमध्ये १७ व १५ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आले होते. या मुलांकडून नियमबाह्य पद्धतीने दीर्घकाळ काम करून घेतले जात असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघड झाला.

तपासात असे आढळून आले की, संबंधित मुलांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. तसेच राहण्याची, जेवणाची आणि सुरक्षिततेची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. सकाळी लवकर कामावर बोलावून त्यांच्याकडून नियमांपेक्षा अधिक वेळ काम करून घेतले जात होते. याशिवाय, कामावर ठेवलेल्या मुलांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक असलेले हजेरीपत्रक तसेच पगारपत्रकही उपलब्ध नव्हते. कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही विमा सुविधा देखील पुरविण्यात आलेली नसल्याचे तपासात समोर आले आहे.

बालकांचे शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी राहुल महाजन याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बालमजुरीविरोधी कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!