जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव जवळील खेडी शिवारात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून सावकारी पाशाचा आणखी एक बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

अक्षय रवींद्र पाटील (वय २५, रा. खेडी शिवार, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. अक्षय एका बँकेत फायनान्स विभागात कार्यरत होता. त्याने काही व्यक्तींकडून खाजगी कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यासाठी संबंधित सावकाराने त्याच्याकडे पैशांचा प्रचंड तगादा लावला होता. “पैसे दिले नाही तर जीवे ठार मारू,” अशी धमकीही त्याला देण्यात आली होती. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर अक्षयने राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला.

रविवारी दुपारी अक्षयने घरातील मागच्या खोलीत गळफास घेतल्याचे त्याच्या वडील आणि बहिणीच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला. अक्षयला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर आज शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत संबंधित दोषी सावकारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!