मराठवाडा विभागीय प्रतिनिधी : अनिरुद्ध साबळे, जालना.

जालना – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर येत्या १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडणार आहेत. मात्र, या मुहूर्ताचा गैरफायदा घेऊन बालविवाह उरकले जाण्याची शक्यता लक्षात घेता, जालना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी याबत सर्व संबंधित विभागांना सतर्कतेचे आदेश दिले असून, बालविवाहाचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना माफी नाही,” अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

१३६ बालविवाह रोखण्यात यश

गेल्या वर्षभरात म्हणजे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जालना जिल्ह्यात सुमारे १३६ बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यामुळे यंदा प्रशासन अधिक आक्रमकपणे मैदानात उतरले आहे.

गाव पातळीपर्यंत यंत्रणा सज्ज

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय

बालविवाहाची माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन *1098*, पोलिस नियंत्रण कक्ष *112*, जवळचे पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे.

कायदा काय सांगतो?

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार, विवाहासाठी मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास *दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा* एकाच वेळी होऊ शकतात.

“बालविवाहाची तयारी सुरू असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावे,” असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. कड यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!