जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. वर्षभर कष्ट करून जोपासलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीतही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर विविध लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी व पत्रकारांनी भेटी देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, फोटो व व्हिडिओ घेतले आणि मदतीची आश्वासने दिली. परंतु आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे केवळ पाहणी दौरे, फोटोसेशन व आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून नुकसानग्रस्त केळी बागांची माहिती दिली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून विमा कंपन्या व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य मदत देण्याच्या सूचना केल्या. तरीदेखील नुकसानभरपाई व विमा दाव्यांबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्हाधिकारी, जळगाव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही अनेक वेळा पंचनामे झाले, मात्र त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. ऑनलाइन तक्रारी करूनही काही ठिकाणी विमा कंपन्यांकडून क्षेत्र कमी दाखविणे किंवा दावे नामंजूर करण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त केळी बागायतदारांना तातडीने सरसकट विना अट, विना शर्त नुकसानभरपाई व पीक विम्याची रक्कम थेट खात्यात जमा करावी. शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
