जळगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” राबविण्यात येणार असून हे सर्वेक्षण दि. ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी सुमारे २५ जातींच्या कुटुंबांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

अमृत संस्थेमार्फत लक्षित गटाच्या प्रगतीसाठी व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा अधिक प्रभावी लाभ देण्यासाठी आणि लक्षित गटातील कुटुंबांची संख्या, त्यांची अपेक्षा, उपलब्ध कौशल्ये व स्थानिक संसाधने यांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करणार आहेत. लक्षित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून सुद्धा त्या संबंधित समाजातील प्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती,पदाधिकारी, अशा व्यक्तींची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माहिती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे अमृतच्या लक्षित गटात मोडणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे इत्यादी यांनी या कालावधीत अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक , विभागीय व्यवस्थापक इत्यादी अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क करून आपल्या परिवाराची, संस्था , संघटना , समाजाची माहिती देऊ शकता व अमृत संस्थेमार्फत सध्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊ शकता.

लक्षित गटातील कुटुंबे, संस्था, संघटना व मंडळांनी या कालावधीत अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची किंवा संस्थेची नोंदणी करावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!