जळगाव : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यात बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ८२ केंद्रांवर तर दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत १४७ केंद्रांवर होणार असल्याची माहिती देण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ५९ हजार ४२० तर बारावीच्या परीक्षेसाठी ४८ हजार २३२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवरील मूलभूत सुविधा बीओ केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी तपासून घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली असून ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे तत्काळ बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे, ५० मीटर परिसरात अनधिकृत प्रवेशास मनाई, तसेच विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले.

संवेदनशील केंद्रांवर बैठी व फिरती पथके, ड्रोन कॅमेरे व व्हिडिओग्राफीद्वारे विशेष लक्ष ठेवले जाणार असून मोबाईलच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर मालप्रॅक्टिसेस कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत परीक्षा केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, सुरक्षा व निरीक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. भरारी पथक व तपासणी पथकांचे प्रभावी नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय साधून विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना निर्भय, शांत व अनुकूल वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्ह्याभरात झूम ॲपद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वर्गामध्ये झूमद्वारे व्हिडिओ चित्रीकरण होईल. याचे नियंत्रण तालुकास्तरावर एक समिती तसेच जिल्हास्तरासाठी देखील एक समिती तयार करण्यात आली आहे, जी पेपर सुरू होण्यापासून संपेपर्यंत लक्ष ठेवेल.

सर्व संबंधित अधिकारी व विभागांना आवश्यक दिशानिर्देश देत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निष्पक्ष, पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!