विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जळगाव : पत्नीला माहेरहून घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाने रागाच्या भरात सासऱ्यावर कुकरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कुसुंबा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कुसुंबा येथील सुरेशदादा जैन नगरात ही घटना घडली. संजय भिमराव जाधव (वय ४२) यांच्या घरी त्यांचे जावई चंद्रकांत ईश्वर बाविस्कर (रा. बांभोरी, ता. जळगाव) हे पत्नीला घेण्यासाठी आले होते.
मात्र, पत्नीने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतापलेल्या चंद्रकांत यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. राग अनावर झाल्याने त्यांनी जवळच असलेला कुकर उचलून सासरे संजय जाधव यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत जाधव गंभीर जखमी झाले.
इतक्यावरच न थांबता चंद्रकांत यांनी सासू आणि मेहुण्यालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमी संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चंद्रकांत बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
